Wednesday, October 10, 2012

' झपाटलेला २' द्वारे मराठीतही थ्रीडीची एंट्री मीनाक्षी कुलकर्णी मुंबई, दि. २८ - मराठी चित्रपट आता प्रगल्भ होत चाललाय, वेगवेगळ्या विषयांवरती चांगले चित्रपट निघू लागले आहेत. या चित्रपटांमधील कंटेटबरोबर त्यातील तंत्रज्ञानही हळूहळू आधुनिक होऊ लागलंय. आणि आता या सगळ्याबरोबर मराठी चित्रपटाने एक पाऊल पुढे टाकलयं ते थ्रीडी च्या सहाय्याने... महेश कोठारे यांचा ९० च्या दशकातील गाजलेला चित्रपट ' झपाटलेला ' चा सिक्वेल लवकरच पडद्यावर येत असून थ्रीडी तंत्रज्ञानावर चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा एक तुरा खोवला जाणार आहे. ' झपाटलेला २' चा मुहुर्त शुक्रवारी नितीन देसाई यांच्या 'एन डी' स्टुडिओत पार पडला. थ्रीडी चित्रपटांचे प्रेक्षकांना असणारं आकर्षण नवीन नाही. १९९७ साली आलेल्या 'टायटॅनिक' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि तसाच उत्तम प्रतिसाद त्याच्या थ्रीडी व्हर्जनलाही मिळाला. भट कॅम्पचा नुकताच प्रदर्शित झालेला 'राज ३' हा चित्रपटही त्याच्या थ्रीडी इफ्केट्समुळे खूप गाजला. हेच लक्षात घेऊन आम्ही मराठीतही थ्रीडी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 'झपाटलेला' हून दुसरा योग्य चित्रपट नव्हता असे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितले. या चित्रपटातील मुख्य कलाकार आणि माझा जीवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपला लाडका 'लक्ष्या' याला घेऊन या चित्रपटाचा सिक्वेल बनवायची माझी इच्छा होती. पण दुर्देवाने ती पूर्ण होऊ शकली नाही. आज ' लक्ष्या ' आपल्यात नसला तरी तो मनात सदैव आमच्याबरोबर आहे आणि त्याचा आशिर्वाद नेहमी आमच्याबरोबर असेल असे सांगत हा चित्रपट लक्ष्यासाठी असल्याचेही महेश कोठारे यांनी सांगितले.थ्रीडी तंत्रज्ञानावर कमालीची हुकुमत असलेले स्पेनचा विख्यात तंत्रज्ञ एन्रिके क्रियाडो या चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत.हॉलीवूडची विख्यात चित्रपट निर्मिती संस्था फॉक्स स्टार स्टुडिओ हे मार्केटिंग व वितरणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहेत. तर तात्या विंचू आणि त्याचा बोलका बाहुला घडवणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये त्यांच्या पत्नी व मुलासह नवीन तात्या विंचूची जबाबदारी सांभाळण्यास सज्ज झाले आहेत. प्रॉडक्शन डिझायनरची जबाबदारी विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सांभाळली असून अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाचे मेन आकर्षण असणारा तात्या विंचू मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूला आव्हान देऊन पुन्हा परत आला तर..! हीच या चित्रपटाची संकल्पना असून महेश कोठारे पुन्हा एकदा त्यांचे अपत्य ' तात्या विंचू ' च्या धमाल कारवाया दाखवण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, विजय चव्हाण आणि मकरंद अनासपुरे यांची दमदार अदाकारी पहायला मिळणार आहे.ओम फट्ट स्वाहा... म्हणत प्रेक्षक खलनायकी कारवाया करणा-या 'तात्या विंचूला' पुन्हा पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक खूप उत्सुक असतील हे नक्की...