Monday, January 16, 2017


कळले मला न केव्हा उलटून रात गेली... विचारांच्या गर्तेत अडकलेल्या माणसांचं नेहमी असंच होतं. आपल्या मनाचा वेग हा प्रकाशापेक्षाही अधिक असतो असं मला ब-याच वेळेला वाटतं, एका विचारातून दुसरा, दुस-यातून तिसरा, अशा एकामागोमाग एक लडी उलगडतच जातात.. कधी हव्या हव्याशा विचारांच्या तर कधी कटू आठवणींच्या, नकोशा विचारांच्या... हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजेही एक विचारच होता. संध्याकाळी फॅमिलीसोबत एक पिक्चर पाहून आले, ‘ती सध्या काय करते’.. विषय अगदी साधा, सोप्पा... आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या प्रेमाचा.. आपल्यापैकी अनेकांनी प्रेम केलं, काहींच पहिलच प्रेम यशस्वी झालं, तर काहींच्या पदरी मात्र आली निराशा.. हा पिक्चर बघताना मीपण जुन्या आठवणीत हरवून गेले. पण मला हा पिक्चर आवडला, तो फक्त पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा म्हणून नव्हे..तर नॉस्टॅल्जिया म्हणून, पिक्चर आवडला कारण आजच्या ख-या आयुष्याचं चित्र दाखवलं म्हणून... जगात सगळ्यांना सगळंच मिळत असं नाही, ब-याच वेळेस हातून अशा गोष्टी, माणसं निघून जातात, जी चुटपूट लावतात. पण प्रत्येकाला आयुष्यातील चूक सुधारायची संधी मिळते असं नाही आणि वेळ उलटून गेल्यावर चूक सुधारूनही उपयोग होत नाही. पण मनात जे साठून राहतं ते बोलून टाकलं, समोरच्याबद्दल आपल्याला काय वाटतं, हे सांगितलं ना तरी मनावरचं मणभराचं ओझ उतरतं. आजच्या आयुष्यात आपल्याला काय कमी व्याप, ताप, कटकटी आहेत की ही ओझीही आयुष्यभर बाळगायची..? आणि एक सांगू का, प्रोफेशनल लाईफमधली टेन्शन्स सहन करता येतातही किंबहुना आपण तेवढे निगरगट्ट बनत जातो. पण पर्सनल लाईफचं काय? प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतोच, जिथे अनेक सल जपून ठेवलेले असतात, आणि आपण ते कुरवाळत राहतो. तिथे पोहोचण्याची कोणालाही परवानगी नसते, अगदी आपली आई, जीवश्च मित्र किंवा आयुष्याच्या जोडीदारालाही.. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, असे अनेक क्षण असतात, किंबहुना आपणच ते जपून ठेवलेले असतात. पण संधी मिळताच त्याबद्दल बोलून, माफी मागून किंवा स्पष्टीकरण मागून सरळ मोकळं व्हावं. समोरचा पुढाकार घेत नसेल तर आपण काही पावलं पुढे जावं. त्याने आपण लहान होत नाहीच पण स्वत:च्याच मनात थोडे उंचावतो. समोरचा काय करेल, कसा वागेल याचाच विचार करत बसलो ना तर मात्र काही खरं नाही. आयुष्यातले सल सोडवा आणि बोला, आणि हे सगळं करा ते फक्त तुमच्यासाठी, स्वत:च्या आनंदासाठी... दुस-यांपेक्षा स्वत:ला खुश आणि मोकळं करण्यासाठी... कारण ह्या आयुष्याची किंमत तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच समजू शकत नाही, कधीच नाही...!

1 comment: