Monday, January 16, 2017


कळले मला न केव्हा उलटून रात गेली... विचारांच्या गर्तेत अडकलेल्या माणसांचं नेहमी असंच होतं. आपल्या मनाचा वेग हा प्रकाशापेक्षाही अधिक असतो असं मला ब-याच वेळेला वाटतं, एका विचारातून दुसरा, दुस-यातून तिसरा, अशा एकामागोमाग एक लडी उलगडतच जातात.. कधी हव्या हव्याशा विचारांच्या तर कधी कटू आठवणींच्या, नकोशा विचारांच्या... हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजेही एक विचारच होता. संध्याकाळी फॅमिलीसोबत एक पिक्चर पाहून आले, ‘ती सध्या काय करते’.. विषय अगदी साधा, सोप्पा... आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या प्रेमाचा.. आपल्यापैकी अनेकांनी प्रेम केलं, काहींच पहिलच प्रेम यशस्वी झालं, तर काहींच्या पदरी मात्र आली निराशा.. हा पिक्चर बघताना मीपण जुन्या आठवणीत हरवून गेले. पण मला हा पिक्चर आवडला, तो फक्त पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा म्हणून नव्हे..तर नॉस्टॅल्जिया म्हणून, पिक्चर आवडला कारण आजच्या ख-या आयुष्याचं चित्र दाखवलं म्हणून... जगात सगळ्यांना सगळंच मिळत असं नाही, ब-याच वेळेस हातून अशा गोष्टी, माणसं निघून जातात, जी चुटपूट लावतात. पण प्रत्येकाला आयुष्यातील चूक सुधारायची संधी मिळते असं नाही आणि वेळ उलटून गेल्यावर चूक सुधारूनही उपयोग होत नाही. पण मनात जे साठून राहतं ते बोलून टाकलं, समोरच्याबद्दल आपल्याला काय वाटतं, हे सांगितलं ना तरी मनावरचं मणभराचं ओझ उतरतं. आजच्या आयुष्यात आपल्याला काय कमी व्याप, ताप, कटकटी आहेत की ही ओझीही आयुष्यभर बाळगायची..? आणि एक सांगू का, प्रोफेशनल लाईफमधली टेन्शन्स सहन करता येतातही किंबहुना आपण तेवढे निगरगट्ट बनत जातो. पण पर्सनल लाईफचं काय? प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतोच, जिथे अनेक सल जपून ठेवलेले असतात, आणि आपण ते कुरवाळत राहतो. तिथे पोहोचण्याची कोणालाही परवानगी नसते, अगदी आपली आई, जीवश्च मित्र किंवा आयुष्याच्या जोडीदारालाही.. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, असे अनेक क्षण असतात, किंबहुना आपणच ते जपून ठेवलेले असतात. पण संधी मिळताच त्याबद्दल बोलून, माफी मागून किंवा स्पष्टीकरण मागून सरळ मोकळं व्हावं. समोरचा पुढाकार घेत नसेल तर आपण काही पावलं पुढे जावं. त्याने आपण लहान होत नाहीच पण स्वत:च्याच मनात थोडे उंचावतो. समोरचा काय करेल, कसा वागेल याचाच विचार करत बसलो ना तर मात्र काही खरं नाही. आयुष्यातले सल सोडवा आणि बोला, आणि हे सगळं करा ते फक्त तुमच्यासाठी, स्वत:च्या आनंदासाठी... दुस-यांपेक्षा स्वत:ला खुश आणि मोकळं करण्यासाठी... कारण ह्या आयुष्याची किंमत तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच समजू शकत नाही, कधीच नाही...!

Saturday, June 28, 2014

कॉलेजियन्सचा दिवाळी कट्टा 28 Oct 2010, 1233 hrs IST

सुट्टी असली, तरी कट्ट्यावर ग्रुपने भेटणं कॉलेजियन्सना आवडतं. पण, सध्या दिवाळीच्या पूर्वतयारीत ही मंडळी प्रचंड बिझी आहेत. कुणी घराची साफसफाई क
रतंय, कुणी वडिलांना रंगकाम करण्यात मदत करतंय, तर मुली किचनमध्ये आईला फराळ बनवण्यात हेल्प करताहेत. एकंदरच काय, सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू असल्याचंच चित्र दिसून येतंय.

' चला, दिवाळी जवळ आली. कामाला लागा...' अशी हाक आईने दिल्यामुळे तमाम कॉलेजियन्स सध्या घरात दिवाळीची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. परीक्षा संपल्यामुळे 'रिकामटेकडे' झालेले हे कॉलेजियन्स घरातल्या खोल्यांमध्ये मुक्त संचार करताहेत. एरव्ही सुट्टीतही कट्ट्यांवर दिसणारी ही मंडळी सध्या घराची साफसफाई, रंगरंगोटी, फराळाची तयारी करण्यात बिझी आहेत. त्यामुळे सगळे कट्टेही ओस पडलेले दिसताहेत.

सकाळी उठून घरातली साफसफाई त्यानंतर दुपारी फराळाला मदत आणि संध्याकाळी 'अत्यावश्यक' वस्तूंची खरेदी असा कॉलेजियन्सचा सध्याचा दिनक्रम आहे. अगदी स्वत:चा खण आवरण्यापासून ते घरातल्या माळ्यावर चढून साफसफाई करेपर्यंत या मंडळींनी मजल मारली आहे. काहींसाठी ही कामं त्यांच्यावर घरच्यांनी लादलेली आहेत, तर काहीजणांना त्यात मजा येतेय. आरकेटी कॉलेजमध्ये एसवायबीएस्सी करणाऱ्या विरेंद महाजन आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येकाच्या घरात आळीपाळीने रंग लावण्याचं ठरवलंय. तर मॉडेल कॉलेजचा सुशील पाटील घराचं रंगकाम करण्यात वडिलांना मदत करतोय.

घरात उत्साहाने अशी कामं करायला तयार होण्यामागे (किमान तसा उत्साह दाखवण्यामागे) या मंडळींची खास कारणंही आहेत. खरेदीचं अर्थकारण यामागे असल्याचं कॉलेजियन्स आवर्जून सांगतात. काम पूर्ण केल्यावर खरेदीच्या वेळी आपल्या मनाजोगी खरेदी करता येते. अगदी कपड्यांपासून बाईकपर्यंत आणि मोबाइलपासून लॅपटॉपपर्यंतच्या मागण्या पूर्ण करून घेता येतात, असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. घरातल्या घरात एक प्रकारची एक्सचेंज ऑफरच असते ही.

एकीकडे झाडलोट, रंगरंगोटी करण्यात मुलं बिझी असतानाच कॉलेजमधल्या तमाम मुली सध्या किचनमध्ये आईला फराळ करण्यात गुंतलेल्या आहेत. कढईमध्ये पीठं भाजण्याचे दिवस सुरू झाले आहेत. सुट्टी लागल्यामुळे घरातल्या कामांमध्ये मदत करणं सुरू झालंय. मला मुळातच घरकामाची आवड असल्याने पूर्ण घराची साफ-सफाई करणं, फराळ बनवण्यात हातभार लावणं ही कामं मी आवडीने करते, असं पंेढारकर कॉलेजमध्ये टीवायबीकॉमला शिकणारी मधुरा कुलकणीर् सांगते. स्वखुशीने अशा कामांमध्ये झोकून देणाऱ्या मुलींची संख्या तशी फारशी नसली तरी पर्याय नसल्यामुळे त्यात आनंद मानायला लागतोय. रांगोळ्यांचा बॉक्स शोधून काढणं, नवीन डिझाइन्स बघणं, पणत्या रंगवणं अशा कामांचा 'अभ्यास' आता सुरू झालाय.

घरातल्या तयारीबरोबरच काही जण चक्क आई-वडिलांबरोबर खरेदीला जायला लागले आहेत. ही खरेदी स्वत:साठी नसून घरच्या जिन्नसांची आणि परमपूज्यांच्या कपड्यांची आहे. त्यामुळे 'मी संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर भेटेन. तयार रहा. आज ड्रेस मटेरियल घेऊनच टाकू,' असे संवाद वडीलधारे आणि आपले कॉलेजियन्स यांच्यात घडत आहेत. कटिंग पीत कट्ट्यावर गप्पा हाणण्याच्या संध्याकाळच्या वेळी ही मुलंमुली हातात दोन-दोन पिशव्या घेऊन खरेदीला जाताना दिसताहेत. फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित असणारी त्यांची शॉपिंग दिवाळीच्या निमित्ताने पडदे, चादरी, उशांचे अभ्रे इतकंच काय पण, कपबशा, भांड्याकुंड्यापर्यंत जाऊन पोहोचलीय.

- श्रीकांत सावंत,

मीनाक्षी कुलकर्णी
( कॉलेज क्लब रिपोर्टर)
Happy B'day पंचमदा 'वेक अप सिड'मध्ये एक वाक्य आहे आएशाच्या (नायिका- कोंकोणा सेन शर्मा) तोंडी.. मुझे पुराने हिंदी गाने अच्छे लगते है.. क्यूंकी वो आसानीसे याद तो रहते है... तिला आवडू लागलेल्या मॅच्युअर बॉसबरोबर जॅझ ऐकायला गेलेली आयेशा.. दोन-तीन वेळा जाऊनही तिला त्यात इंटरेस्ट येत नाही, तेव्हा तो तिला विचारतो, तुला कोणत्या प्रकारच संगीत आवडतं , तेव्हा ती हे उत्तर देते आणि तिचा बॉस तिला 'बालिश' म्हणून हसतो. त्या वेळेस तिला जेवढं वाईट वाटलं त्याहून दसपट मला वाटलं. नायिकेला तो काही बोलला याचा राग नव्हता, पण गाण्यांबद्दल बोलला याच.. गाण, संगीत हे संगीत असतं, प्रत्येकाला ते का आवडावं हे व्यक्तीसापेक्ष आहे, त्यावरून चिडवण्याची गरज काय? असं वाटल होतं मला. खरं तर मला गाण्यातलं फारसं काही कळतं नाही. पण तरीही गाणी ऐकण हे माझा आवडता विरंगुळा आहे. 'अत्यंत आवडती गाणी ऐकणे' हे माणसासाठी अतिशय soothing असतं. तुमच्या दुखावलेल्या मूडला, मनाला किंवा माणसांनाही खुश करण्यासाठी आवडती गाणी लावणं हा सर्वोत्तम उपाय आहे, असं मला वाटतं. गाणं कोणतही असो, 'मोहित चौहानचं तुमसे ही' किंवा 'उदित नारायणंच पहला नशा', 'आशा भोसलेंचं एखादं गाणं' किंवा 'किशोर कुमार यांचं गाणं'.. बघायला गेलं तर यांच्यात काहीही साम्य नाही, म्हटलं तर आहे. सर्वजण उत्तम संगीताच्या धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेले. एखाद्या अप्रिय घटनेमुळे, किंवा एखाद्याच्या कृतीमुळे, बोलण्यामुळे आपण जेव्हा दुखावले जातो, vulnerable झालेले असतो, विचारांच्या गर्तेत अडकलेले असतो आणि प्रयत्न करूनही त्यातून जेव्हा बाहेर पडू शकत नाही, तेव्हा सरळ गाणी ऐकावीत.. गाण्याचे शब्द, ते संगीत, बीट्स हळूहळू तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत नेतात, जिथे आनंदाशिवाय काहीही नसतं. तुम्ही आणि फक्त सुमधुर संगीत. मी तरी असचं करते. 'कालही असाच एक प्रसंग घडला. कित्येक दिवसांपासून एक गोष्ट पूर्ण व्हायची, मार्गी लागायची आतुरतेने वाट पहात होते, पण मनासारखं काहीच न होत, परिस्थिती अजून चिघळत गेली. त्यामुळे मूड प्रचंड खराब. दिवस तशाच मन:स्थितीत गेलेला. ऑफीसध्ये काम करताना एवढं लक्ष दिल नाही, पण बाहेर पडल्यावर मात्र सगळे नकोसे विचार परत पिंगा घालायला लागले. काय करवा सुटत नव्हत. पण तेवढ्यात लक्षात आलं की आज दिवसभर टीव्हीवर दाखवत होते, की आज आर. डी. बर्मन यांचा वाढदिवस. ब-याच बॉलिवूडप्रेमींप्रमाणे मीही त्यांची गिनीचुनी गाणी ऐकलेली. 'ओ मेरे दिल के चैन,' 'रिमझिम गिरे सावन', 'तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही', 'चिंगारी कोई भडके' ही आणि अशी तत्सम गाणी माझ्या प्लेलिस्टमध्ये आणि सतत ऐकल्यामुळे आवडलेलीही. पण मग थोडं सर्च करून नेटवरून आणखी दोन - चार गाणी डाऊनलोड केली. आणि आत्तापर्यंत फक्त मुखडा ऐकलेल लता मंगेशकरांच्या आवाजतलं 'मेरी आवाजही पेहचान है', किशोरदांच्या आवाजतलं 'फिर वो ही रात है' आणि अशी गाणी पुन्हा पुन्हा ऐकली. आणि त्यात कधी गुंगून गेले कळलंच नाही. माझा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल ते माहीत नाही, पण पंचमदांची अनेक गाणी ऐकत ऐकत माझी कळी कधी खुलली, मूड पूर्ववत झाला कळलंच नाही... माझ्या आयुष्यात एवढी मस्त गाणी ऐकायला देणा-या 'पंचम'दांना Belated Happy Birthday.. तुमचं काम फक्त फिल्मी गाण्यांपुरतं मर्यादित नव्हतं हे माहित्ये, त्यामुळे तुमची बरीच क्लासिक गाणी ऐकण्यासाठी लौकरच भरपूर वेळ काढणार आहे. तुमच्या मस्त गाण्यांच्या आणि अजरामर संगीताच्या रुपाने तुम्ही आम्हा सर्वांच्या हृदयात नेहमीच रहाल. Happy B'day once again :)

Wednesday, October 10, 2012

' झपाटलेला २' द्वारे मराठीतही थ्रीडीची एंट्री मीनाक्षी कुलकर्णी मुंबई, दि. २८ - मराठी चित्रपट आता प्रगल्भ होत चाललाय, वेगवेगळ्या विषयांवरती चांगले चित्रपट निघू लागले आहेत. या चित्रपटांमधील कंटेटबरोबर त्यातील तंत्रज्ञानही हळूहळू आधुनिक होऊ लागलंय. आणि आता या सगळ्याबरोबर मराठी चित्रपटाने एक पाऊल पुढे टाकलयं ते थ्रीडी च्या सहाय्याने... महेश कोठारे यांचा ९० च्या दशकातील गाजलेला चित्रपट ' झपाटलेला ' चा सिक्वेल लवकरच पडद्यावर येत असून थ्रीडी तंत्रज्ञानावर चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा एक तुरा खोवला जाणार आहे. ' झपाटलेला २' चा मुहुर्त शुक्रवारी नितीन देसाई यांच्या 'एन डी' स्टुडिओत पार पडला. थ्रीडी चित्रपटांचे प्रेक्षकांना असणारं आकर्षण नवीन नाही. १९९७ साली आलेल्या 'टायटॅनिक' या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि तसाच उत्तम प्रतिसाद त्याच्या थ्रीडी व्हर्जनलाही मिळाला. भट कॅम्पचा नुकताच प्रदर्शित झालेला 'राज ३' हा चित्रपटही त्याच्या थ्रीडी इफ्केट्समुळे खूप गाजला. हेच लक्षात घेऊन आम्ही मराठीतही थ्रीडी चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 'झपाटलेला' हून दुसरा योग्य चित्रपट नव्हता असे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितले. या चित्रपटातील मुख्य कलाकार आणि माझा जीवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपला लाडका 'लक्ष्या' याला घेऊन या चित्रपटाचा सिक्वेल बनवायची माझी इच्छा होती. पण दुर्देवाने ती पूर्ण होऊ शकली नाही. आज ' लक्ष्या ' आपल्यात नसला तरी तो मनात सदैव आमच्याबरोबर आहे आणि त्याचा आशिर्वाद नेहमी आमच्याबरोबर असेल असे सांगत हा चित्रपट लक्ष्यासाठी असल्याचेही महेश कोठारे यांनी सांगितले.थ्रीडी तंत्रज्ञानावर कमालीची हुकुमत असलेले स्पेनचा विख्यात तंत्रज्ञ एन्रिके क्रियाडो या चित्रपटाची तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत.हॉलीवूडची विख्यात चित्रपट निर्मिती संस्था फॉक्स स्टार स्टुडिओ हे मार्केटिंग व वितरणाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहेत. तर तात्या विंचू आणि त्याचा बोलका बाहुला घडवणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये त्यांच्या पत्नी व मुलासह नवीन तात्या विंचूची जबाबदारी सांभाळण्यास सज्ज झाले आहेत. प्रॉडक्शन डिझायनरची जबाबदारी विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सांभाळली असून अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाचे मेन आकर्षण असणारा तात्या विंचू मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूला आव्हान देऊन पुन्हा परत आला तर..! हीच या चित्रपटाची संकल्पना असून महेश कोठारे पुन्हा एकदा त्यांचे अपत्य ' तात्या विंचू ' च्या धमाल कारवाया दाखवण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, विजय चव्हाण आणि मकरंद अनासपुरे यांची दमदार अदाकारी पहायला मिळणार आहे.ओम फट्ट स्वाहा... म्हणत प्रेक्षक खलनायकी कारवाया करणा-या 'तात्या विंचूला' पुन्हा पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक खूप उत्सुक असतील हे नक्की...

Monday, May 2, 2011

Gudhipadwa article- aamod gadre- pardeshatil yashaswi tarun

एखादी व्यक्ती कितीही यशस्वी झाली ना, तरीही माणूस म्हणून ती किती मोठी आहे हे महत्वाचं.... तुम्ही कितीही यशस्वी झालात, तरी एक माणूस म्हणून लोकं तुमचा किती आदर करतात हे तुमच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून असतं.. आणि अशा वेळेस महत्वाचे ठरतात ते तुमचे संस्कार जे तुम्हाला यशस्वी व्हायला नेहेमीच मदत करतात..
आमोद गद्रे.... अमेरिकेतील डेट्रॉईट येथे "जनरल मोटर्स" या जगातील पहिल्या क्रमांकाच्या कंपनीत गेली दहा-बारा वर्षांपासून काम करत आहेत. आणि सध्या पुण्यात लीड प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहेत. १९९८ साली भारतातून मे़कॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर मास्टर्स करण्यासाठी अमोदने अमेरिकेतील " ओहायो" राज्यातील "टोलीडो "युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. इतर अनेक तरुणांप्रमाणेच जनरल मोटर्समध्ये काम करण्याच स्वप्न मनाशी बाळगून मेहनतीने वाटचाल सुरू केली. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज तो पुण्यात लीड प्रोजेक्ट मॅनेजर ( इंजिन असेम्ब्ली आणि टेस्ट ) काम करतोय. गेल्या १२ वर्षात त्याने अमेरिकेतच नव्हे तर मेक्सिको मधेही इंजिन असेम्ब्ली आणि टेस्ट लाईन्स उभारल्या आहेत आणि आता भारतात इंजिन असेम्ब्ली आणि टेस्ट लाईन उभारण्यासाठी deputation वर जनरल मोटर्स कंपनी तर्फे आला आहे.
अमेरिकेत काम करणं हा एक सुखद तसाच वेगळा अनुभव होता. वेगळी संस्क्रुती, वेग ळ्या वातावरणात शून्यातून करीअर उभं करताना खूप कष्ट तर करावे लागले पण मी हेही लक्षात ठेवलं की मी स्वत:च्या देशाच प्रातिनिधीत्व करत होतो. तुमचे ध्येय काय आहे, हे एकदा स्प्ष्ट झाल्यावर ते साध्य करण्यासाठी सकारात्मक द्रुष्टिकोन ठेवून प्रयत्न्न करण महत्वाच असत. पण तेव्हाही हे लक्षात ठेवल पाहिजे की, तुम्ही कितीही मोठ्ठे व्हा स्वत:ची ओळख, तत्व विसरू नका. यशाची नशा चढता कामा नये. तरच माणूस म्हणूनही मोठ्ठे व्हाल. तेच यशाचे खरे गमक आहे.

"टूनपूरचे मराठी सुपरहिरो"

वर्षाचा शेवटचा महिना उजाडलाय, सगळीकडे उत्साहाचं, सेलिब्रेशनच वातावरण आहे. मग यात 'बॉलिवूड' तरी कसं मागे राहील? “ टूनपूर का सुपरहीरो” या चित्रपटाच्या निमित्ताने या वर्षाअखेरीस "३डी अ‍ॅनिमेशन आणि लाईव्ह अ‍ॅक्शन" असा एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची जान असलेलं ' अ‍ॅनिमेशन वर्क' करणारे सर्व अ‍ॅनिमेटर्स मराठी असून हॉलिवूडच्या तोडीस-तोड हा चित्रपट बनला आहे. "क्लाईंब मिडीयाच्या किरीट खुराणा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कंपनीतील त्यांचे सहकारी अरूण माने, प्रशांत शिकारे, रविराज कुंभार आणि अरविंद शिर्के यांनी अ‍ॅनिमेशनची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे सांभाळली आहे.

ब्लॉकमध्ये किरीट खुराणा (दिग्दर्शक) - हा चित्रपट म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक मोठ आव्हान होतं, कारण एक तर अतिशय मोजक्या लोकांच्या सहायाने काम पूर्ण करायच होत . हॉलिवूड सारख्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीही आमच्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे हा चित्रपट बनवण्यात आमच्या अ‍ॅनिमेटर्सनी सिंहाचा वाट उचलला आहे. दिवस-रात्र मेहनत करून, कधीकधी माझा ओरडा खाऊन, मूड सांभाळून घेतला पण कोणीही बॅक-आऊट नाही केलं, आणि त्यामुळेच हे अवघड आव्हान पेलणं सोप झालं.

या चित्रपटावर गेली ३ वर्ष काम करणारे आणि चित्रपटाच 'प्री-प्रोडक्शनच' , कॅरॅक्ट् र डिझाईनिंग, सीनची लांबी, म्हणजेच शूट होण्यापूर्वी करावी लागणारी पूर्ण तयारी वगैरे सर्व व्यवस्थित सांभाळणारे प्रशांत शिकारे, 'क्लाईंब मिडीया'मध्ये गेली ५ वर्ष काम करत आहेत. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना अ‍ॅनिमेशनच तंत्रशुध्द प्रशिक्षण घेता आलं नाही, पण तरीही या क्षेत्रा त पाऊल टाकल्यावर अनेक गोष्टी शिकत, आत्मसात करत, तर कधी चुका करत ते इथवर पोचले आहेत. 'टूनपूर'बद्दल ते सांगतात की या चित्रपटात " एक ५४ सेकंदाचा सीन आम्हाला सलग( १ टेक ओके) करायचा होता, आणि त्यावेळेस माझी खरी परीक्षा होती, कारण मी आत्तापर्यंत फक्त जाहि रातींसाठी अ‍ॅनिमेशन केले होतं, चित्रपटसाठी अ‍ॅनिमेशन हा एक नवीन अनुभव होता. मग सीन कसा शूट होणार, कॅमेरा अँगल्स, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि तो सीन "१ टेक ओके" केला. हा माझ्यासाठी एक वेगळा आणि आत्मविश्वास देणारा अनुभव होता.

चित्रपटातील 'प्री-प्रोडक्शनच' (pre – production) च्या कामात प्रशांतला मदत करणारा आणि अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर्सचे (पात्रांचे) रंग, कपडे, वेशभूषा आणि चित्रपटाती सर्व भागांच कलरिंग सांभाळणारा कोल्हापूरचा रविराज कुंभार हा लहानपणापासूनच खूप सुंदर चित्र काढायचा. घरी सगळेजण कलाकार असल्याने पोषक वातावरणही होते. त्यामुळे त्याने 'कोल्हापूरच्या' कलानिकेतन महाविद्यालयातून ‘फाईन आर्ट्सचा’ ५ वर्षांचा कोर्स पूर्ण केला आणि गेली ३ वर्ष तो 'Climb Media' मध्ये काम करतोय. सेट मॅक्स चॅनलवरचा दिवाना टायगर, अॅतक्शन अण्णा, ब्रिटानिया टायगर अशा अनेक ' निमेटेड' जाहिराती प्रशांतच्या सहाय्याने करणार्‍या रविराजला 'टूनपूर' मुळे मोठा ब्रेक मिळालाय. यातली सगळी 'अ‍ॅनिमेटेड' characters ही आजूबाजूच्या परिसरातल्या आधारलेल्या लोकांवरूनच (observation) करून घेतली आहेत. आणि त्यामुळे त्यांचे कपडे - बोलणं, चालणं, अगदी खरंखुरं वाटतं, ह्याच श्रेय रविराजच्या 'निरिक्षण शक्तीलाच' जातं.

अ‍ॅनिमेशन क्षेत्रात गेल्या १३ वर्षांपासून असणारे "अरुण माने" हे "क्लाईंब मिडीया"चे ३डी स्टुडियो प्रमुख तर आहेतच पण या चित्रपटासाठी 'टेक्निकल डिरेक्टर ' म्हणूनही त्यांनी कम पाहिलय. याबद्दल ते सांगतात, अतिशय कमी लोकांना बरोबर घेऊन एवढ्या मोठ्या लांबीचा चित्रपट तयार करणं हे आमच्यासाठी एक आव्हानच होतं. पण तरीही हे आव्हान पेलून एकीकडे या चित्रपटावर(जे आमच एक स्वप्न आहे) काम करत, आम्ही आमच्या नेहमीच्या क्लायंट्सची कामही यशस्वीपणे पूर्णही केली.

या क्षेत्रात येणार्‍यांनी (तरुणांनी) हे लक्षात ठेवलं पाहिजे की, झोकून देऊन काम करता यायला हवं... जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्वर काम करत असता तेव्हा फक्त ढोर मेहनत करून चालत नाही, तर तुम्हाला तुमच काम अतिशय कल्पकतेने आणि हुशारीने करता यायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'संयम' बाळगणे. आपण खूप मेहनत करून एखाद काम पूर्ण करतो, पण ते समोरच्याला आवडेलच असं नाही अशा वेळेस जो निराश न होता तितक्याच प्रयत्नपूर्वक आणि कामाची गती वाढल्यावरही झोकून देऊन काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो.

तुमची जर मनापासून भरपूर मेहनत केलीत, तर तुम्हाला यश हमखास मिळतेच, हे या तिघाही मराठी तरुणांच्या उदाहरणावरून हे नक्कीच सिद्ध होत.

ब्लॉक मध्ये (अरविंद शिर्के)- बॅकबोन ऑफ कंपोझिशन डिपार्टमेंट - क्लाईंब मिडियाचे संस्थापक भीमसेन खुराणा यांच्याबरोबर सुरुवातीपासून काम करणारे अरविंद शिर्के कंपोझिशन डिपार्टमेंटचे आधारस्तंभ आहेत. गेल्या २०-२५ वर्षातील तंत्रज्ञानाचा प्रवास जवळून पाहिलेले शिर्के सांगतात, पूर्वी आम्हाला एक सीन शूट करून त्याच एडिटिंग पूर्ण करायला १-२ दिवस सहज लागायचे, पण तेच काम आता अर्ध्या तासाच्या आतच होत. या चित्रपटाबद्दल ते म्हणतात की आधी आमच्या कंपनीने बर्‍याच अ‍ॅनिमेटेड जाहिराती बनवल्या आहेत, पण आता पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या लांबीची ३डी आणि लाईव्ह अ‍ॅक्शन फिल्म बनवली आहे. अवघ्या १०-१५लोकांच्या सहाय्याने हे काम करणं म्हणजे एक आव्हानच होतं, पण तरीही या सगळ्या मुलांनी खरच खूप उत्तम काम करून, 'सुंदर' साँग बनवलय, यात शंकाच नाही. (25/12/2010)

Ubharti Tarunai

इंग्रजांनी भारताला दिलेल्या अनेक बर्‍यावाईट गोष्टीपैकी क्रिकेट ही एक अशी गोष्ट आहे की ह्या खेळातली गंमत, जोश अजून टिकून आहे पण त्याबरोबरच नव्या स्वरूपातल्या स्पर्धांमुळे येणारा प्रचंड पैसा ह्यामुळे आपल्या देशात 'क्रिकेट' हा आता इंग्रजांनी दिलेला नुसता खेळ राहिला नसून तो एक धर्मच झालाय. अन् एक मोठा उद्योगही! अन् ह्या धर्माचे लोक कुणीही अगदी कुणीही असू शकतात! ह्यात जात हा मुद्दा गौण ठरतो! सगळे जण मोठ्या भक्तिभावाने आपापल्या लाडक्या दैवतांची पूजा करतात आणि आता तर 'सचिन' नावाच्या देवासाठी फेब्रुवारीत होणारं विश्वचषकाच महायुद्ध जिंकायला भारतीय संघ पुर्‍या तयारीने उतरेल ह्यात वादच नाही. ह्याच दरम्यान मागच्या महिन्यात ठाणे परिसरातील काही उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू थायलंडचा दौरा गाजवून आले त्या निमित्ताने ह्या दौर्‍याचा आढावा व तरूण खेळाडूंशी बातचीत करून यंग जनरेशन मधलं टॅलेन्ट पुढं आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न -

ठाणे जिल्यातील दहा होतकरू तरूण नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकॉक (थायलंड) येथे २७ व्या रॉयल "बँकॉक स्पोर्ट्स क्लबच्या इंटरनॅशनल क्रिकेट सिक्सेस" ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी निवडले गेले. हे सर्व तरूण राज क्रिकेट अ‍ॅकेडमी,(RCA) ठाणे येथे श्री.बाळा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतात. ठाण्याचा ह्या क्लबने सलग चौथ्या वर्षी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साउथ आफ्रिका, न्युजीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया इ. देशांचे २९ क्रिकेट क्लब्स ह्या स्पर्धेत सहभागी झाले. ह्या वर्षी २० -२३जानेवारी दरम्यान ही स्पर्धा रॉयल बँकॉक स्पोर्ट्स क्लबवर झाली.

स्पर्धेचा आराखडा (फॉर्मॅट) -
ह्या स्पर्धेत प्रत्येकी सहा खेळाडू आपापल्या संघाच प्रतिनिधित्व करतात. ज्यावेळी एक संघ बॅटिंग करतो तेंव्हा प्रतिस्पर्धी संघाचे सहा खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करतात ह्यात एक विकेटकीपर, एक बॉलर आणि चार क्षेत्ररक्षक असतात. प्रत्येक मॅच ही पाच षटकांची असते.

RCA ची स्पर्धेतली कामगिरी -
ह्या वर्षी राज क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या (RCA) टीमने आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानच्या - यूबीएलब्ल्यू (UBL Blue) टीमवर विजय मिळवला. UBL Blue ने प्रथम फलंदाजी स्वीकारत पाच षटकात ६० धावा केल्या. जिंकण्यासाठीच हे आव्हान RCA नं चौथ्या षटकातच गाठलं. RCA च्या मन्मथ आपटेने २० धावा काढल्या तर सुरज शेट्टी २६ धावांवर नाबाद राहिला. पुढच्या साखळी सामन्यात RCA नं स्पोर्ट्स प्रमोटर्स (Sports Promoters (Gujrat) च्या ५६ ह्या धावसंख्येच्या पाठलाग पाच षटकात तीन बाद ५८ असा करत हाही सामना जिंकला. ह्या सामन्यात सुरज शेट्टी २८ धावांवर नाबाद राहिला तर मन्मथ आपटे २६ धावांवर नाबाद राहिला. RCA नं उपांत्य फेरीत धडक मारली. पण ते फायनल मध्ये पोचू शकले नाहीत.

कोच व खेळाडूंशी झालेली बातचीत -

श्री. बाळा शेट्टी - कोच - राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी - ठाणे.
राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी २००३ साली स्थापन करणारे बाळा शेट्टी मुळचे मुंबईचेच. क्रिकेटची अतिशय आवड अन् ह्या खेळासाठी घरचा पाठिंबा, कठोर मेहनत ह्यामुळेच ते एक उत्कृष्ठ खेळाडू बनले. १२वी नंतर पुढील शिक्षणासाठी बंगळुरूच्या (तेंव्हाच बँगलोर) सेंट जोसेफ कॉलेजमध्ये गेले. शिक्षणाबरोबरच क्रिकेटचेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत त्यांनी अनेक आंतर - महाविद्यालयीन मॅचेसमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. 'ब्रिजेश पटेल यांच्या टीममध्ये, कधी स्वस्तिक युनियन टीम बरोबर खेळताना १९८५ साली भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या कोचिंग कॅम्पमध्ये अनेक रणजी व टेस्ट खेळाडूंबरोबर मैदान शेअर केले. तसेच कर्नाटक राज्याच्या टीममधून खेळताना १९९१ ते १९९३ - सलग तीन वर्ष 'इंग्लंड' मधील 'कौंटी' क्रिकेटही खेळले. ९३ साली झालेल्या एका अपघातामुळे त्यांना काही वर्ष सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. पण तेंव्हाही स्वस्थ न बसता, घरचा 'बिझनेस' यशस्वीपणे चालवला. २००२ साली पूर्णपणे बरं झाल्यावर, त्यांच्या मनातल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी पुन्हा 'क्रिकेटवर' लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. पण यावेळेस स्वत: न खेळता आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग दुस र्‍यांना करून द्यावा, याच उद्देशानेच २००३ साली त्यांनी 'राज क्रिकेट अ‍ॅकॅडमी' ची स्थापना केली. आणि तेंव्हापासूनच ह्या अ‍ॅकॅडमीतील मन्मथ आपटे, सूरज शेट्टी, ओंकार राणे, जयेश पाटील, नील भानुशाली, शमीम शेख यासारख्या अनेक होतकरू, गुणी खेळाडूंनी मैदान गाजवण्यास सुरूवात केली.

कठोर सराव, रेग्युलर फिटेनस टेस्ट्स याबरोबर अनेक प्रॅक्टिस मॅचेस (साधारण आठवड्याला एक) हे या अ‍ॅकॅडमीच्या यशाच गमक! याबाबत श्री. बाळा शेट्टी सांगतात की, मी आमच्या पिढीतील अनेक खेळाडूंना घडताना पाहिलंय. सचिन, राहूल, लक्ष्मण, यांच्यासारखे खेळाडू ढोर मेहनत तर अजूनही करतात ती कुणालाच चुकलेली नाही, पण त्याबरोबरच त्यांच्या ठायी नम्रपणा, शिकण्याची वृत्ती आजही दिसून येते. आज माझ्या अ‍ॅकॅडमीतील प्रत्येक खेळाडूत गुणवत्ता ठासून भरल्ये. पण त्याबरोबरच त्यांना फिटनेस राखणे अत्यावश्यक आहे. सातत्य, फिटनेस, निश्चयाने प्रॅक्टीस करणे, आत्मविश्वास हे आज यशस्वी होण्याचे की फॅक्टर्स आहेत. आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त. ती अंगी बाणवली, तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि टिकूनही रहाल.

अ‍ॅकॅडमीच्या आजवरच्या प्रवासात आत्तापर्यंत आम्ही देशातल्या तसेच परदेशातल्या अनेक टीम्सबरोबर अनेकदा खेळलो आहोत. श्रीलंका, बँकॉक, इथे आत्ताच आमची टीम जाऊन आली. ह्या दौ र्‍यात आमच्या मुलांना तिकडे खेळून त्यांची टेक्निक्स जाणून घेता आली, तिथल्या सिनियर्सशी बोलून मार्गदर्शनही मिळालं ज्याचा उपयोग नक्कीच भविष्यात होईल. अजून सुधारणेसाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टीस मॅचेस खेळाव्यात याकडे आमचा कल असतो.


मन्मथ आपटे - फर्स्ट इयर बी. कॉम. - व्ही. पी. ए म्स. आर. झेड. शहा कॉलेज - मुलुंड.
पाच सहा वर्षांपासून / ( वयाच्या १४व्या वर्षापासून) क्रिकेट खेळतोय. या सरांची ओळख व्हीपीएम कॉलेजमधून खेळत असताना झाली. गेल्या सहा महिन्यापासून श्री. बाळा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली राज क्रिकेट अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण घेतोय. इथं आल्यापासून बॅटिंग आणि फिटनेसवर कठोर मेहनत घेतल्यामुळे इंप्रूव्हमेंट झाली. बॅटिंग टेक्निकमुळे परफॉर्मन्स बहरत गेला. भारताबाहेरची ही माझी पहिलीच टूर. श्रीलंकेत मी पूर्ण सीरीजमध्ये कर्णधार बनण हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता , पण त्यबरोबरच थोडं दडपणही आलं होतं. पण आमच ओव्हर-ओल पर्फॉरम्न्स खूप छान झाला, आणि माझ्या (बॉलिंग) कामगिरीवर सरही खुश होते. आमच्या या टूरच आणखी एक वैशिष्ट्य म्ह ण जे आमच सगळ्यात छोटा खेळाडू ' नील भानुशाली'. अवघ्या चौथीत ल्या नील च्या खेळ्ण्यात एक मॅच्युरिटी दिसून येते. अजून तो लहान अस ला तरी, जसाजसा तो मोठा होत जाईल, तसतसा त्याचा स्टॅमिना आणि कॉन्फिडन्स वाढत जाईल, आणि तो एक सरस खेळाडू बनेल यात शंकाच नाही.
बँकॉक आणि श्रीलंकेच्या टूरमधून आम्हाला बरच काही शिकायलाही मिळालं. तिकडची पिचेस, खेळ्ण्याची ट्क्निक्स बरीच प्रगत आहेत. आणि तेथील खेळाडू बरेच मोठे आणि अनुभवी होते, त्यामुळे आम्हालाही बरंच काही शिकायला मिळालं.

सुरज शेट्टी - फायनल इयर - मेकॅनिकल इंजिनियरिंग - दत्ता मेघे कॉलेज - ऐरोली.
क्रिकेट हे माझं सर्वस्व / पॅशन आहे. गेली १२ वर्ष मी क्रिकेट खेळतोय. शेट्टी सर हे माझ्या वडिलांचेच मित्र गेल्या सात आठ महिन्यांपासून मी शेट्टी सरांकडे कोचिंग घेतोय. सर आमच्यावर खूप मेहनत घेतात आणि त्याचा आमच्या फिटनेसवर, ओव्हर ऑल गेम वर पॉझिटिव्ह परिणाम होताना जाणवतोय. नुकत्याच झालेल्या बॅकॉक टूरवर जाऊन आलो तिथं आम्ही गुजरात, हैद्राबाद, कोलकाता (पूर्वीच कलकत्ता) ह्या आपल्या देशातल्या टीम्स विरुद्ध खेळलोच तसंच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, बहारिन ह्या टीम्स विरूद्धही खेळलो आणि सेमी फायनलपर्यंतही पोहचलो. तिथं आम्हाला अनेक सिनिअर खेळाडूंशी बातचीत करता आली त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप फायदा झाला. ह्या स्पर्धेतील बरेचसे खेळाडू इंटरनॅशनल लेव्हलवर खेळलेले होते. साहजिकच त्यांच्या बरोबरच्या प्रत्येक सामन्यातली लढतही अतिशय अटीतटीची झाली. अर्थात हे आम्हाला अपेक्षित होतच. ह्या अनुभवाचा फायदा आम्हाला भविष्यात आमची टीम बळकट करण्यात नक्कीच होईल असा मला विश्वास वाटतो.