' चला, दिवाळी जवळ आली. कामाला लागा...' अशी हाक आईने दिल्यामुळे तमाम कॉलेजियन्स सध्या घरात दिवाळीची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. परीक्षा संपल्यामुळे 'रिकामटेकडे' झालेले हे कॉलेजियन्स घरातल्या खोल्यांमध्ये मुक्त संचार करताहेत. एरव्ही सुट्टीतही कट्ट्यांवर दिसणारी ही मंडळी सध्या घराची साफसफाई, रंगरंगोटी, फराळाची तयारी करण्यात बिझी आहेत. त्यामुळे सगळे कट्टेही ओस पडलेले दिसताहेत.
सकाळी उठून घरातली साफसफाई त्यानंतर दुपारी फराळाला मदत आणि संध्याकाळी 'अत्यावश्यक' वस्तूंची खरेदी असा कॉलेजियन्सचा सध्याचा दिनक्रम आहे. अगदी स्वत:चा खण आवरण्यापासून ते घरातल्या माळ्यावर चढून साफसफाई करेपर्यंत या मंडळींनी मजल मारली आहे. काहींसाठी ही कामं त्यांच्यावर घरच्यांनी लादलेली आहेत, तर काहीजणांना त्यात मजा येतेय. आरकेटी कॉलेजमध्ये एसवायबीएस्सी करणाऱ्या विरेंद महाजन आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येकाच्या घरात आळीपाळीने रंग लावण्याचं ठरवलंय. तर मॉडेल कॉलेजचा सुशील पाटील घराचं रंगकाम करण्यात वडिलांना मदत करतोय.
घरात उत्साहाने अशी कामं करायला तयार होण्यामागे (किमान तसा उत्साह दाखवण्यामागे) या मंडळींची खास कारणंही आहेत. खरेदीचं अर्थकारण यामागे असल्याचं कॉलेजियन्स आवर्जून सांगतात. काम पूर्ण केल्यावर खरेदीच्या वेळी आपल्या मनाजोगी खरेदी करता येते. अगदी कपड्यांपासून बाईकपर्यंत आणि मोबाइलपासून लॅपटॉपपर्यंतच्या मागण्या पूर्ण करून घेता येतात, असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. घरातल्या घरात एक प्रकारची एक्सचेंज ऑफरच असते ही.
एकीकडे झाडलोट, रंगरंगोटी करण्यात मुलं बिझी असतानाच कॉलेजमधल्या तमाम मुली सध्या किचनमध्ये आईला फराळ करण्यात गुंतलेल्या आहेत. कढईमध्ये पीठं भाजण्याचे दिवस सुरू झाले आहेत. सुट्टी लागल्यामुळे घरातल्या कामांमध्ये मदत करणं सुरू झालंय. मला मुळातच घरकामाची आवड असल्याने पूर्ण घराची साफ-सफाई करणं, फराळ बनवण्यात हातभार लावणं ही कामं मी आवडीने करते, असं पंेढारकर कॉलेजमध्ये टीवायबीकॉमला शिकणारी मधुरा कुलकणीर् सांगते. स्वखुशीने अशा कामांमध्ये झोकून देणाऱ्या मुलींची संख्या तशी फारशी नसली तरी पर्याय नसल्यामुळे त्यात आनंद मानायला लागतोय. रांगोळ्यांचा बॉक्स शोधून काढणं, नवीन डिझाइन्स बघणं, पणत्या रंगवणं अशा कामांचा 'अभ्यास' आता सुरू झालाय.
घरातल्या तयारीबरोबरच काही जण चक्क आई-वडिलांबरोबर खरेदीला जायला लागले आहेत. ही खरेदी स्वत:साठी नसून घरच्या जिन्नसांची आणि परमपूज्यांच्या कपड्यांची आहे. त्यामुळे 'मी संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर भेटेन. तयार रहा. आज ड्रेस मटेरियल घेऊनच टाकू,' असे संवाद वडीलधारे आणि आपले कॉलेजियन्स यांच्यात घडत आहेत. कटिंग पीत कट्ट्यावर गप्पा हाणण्याच्या संध्याकाळच्या वेळी ही मुलंमुली हातात दोन-दोन पिशव्या घेऊन खरेदीला जाताना दिसताहेत. फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित असणारी त्यांची शॉपिंग दिवाळीच्या निमित्ताने पडदे, चादरी, उशांचे अभ्रे इतकंच काय पण, कपबशा, भांड्याकुंड्यापर्यंत जाऊन पोहोचलीय.
- श्रीकांत सावंत,
मीनाक्षी कुलकर्णी
( कॉलेज क्लब रिपोर्टर)
No comments:
Post a Comment