Wednesday, November 24, 2010

एकमेव 8 Mar 2010, 0055 hrs IST

चूल आणि मूल या घरच्या आघाड्या सांभाळून स्वत:चं करिअर घडवणारी ही स्त्री. करिअरसाठी वेगवेगळ्या वाटा निवडतानाच पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षे
त्रांतही त्यांचा सहभाग वाढू लागला. एविएशन ऑफिसर प्रतिभा सरोदे अशा स्त्रियांपैकी एक.

विमानळावर येणाऱ्या विमानात इंधन भरण्याचं काम गेली दहा ते बारा वर्षं त्या करत आहेत. हेड ऑफिसमध्ये काम करताना प्रमोशनची संधी चालून आली ती हे वेगळं काम हाती घेऊनच. एक आव्हान म्हणून हे काम स्वीकारल्यानंतर खडतर ट्रेनिंग घेणं, इंधन भरताना त्याचा दर्जा कायम ठेवण्यासाठी क्वॉलिटी चेक करणं, डॉक्युमेण्टेशन यासारख्या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागला. अनेक परीक्षा होऊन, डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन लायसन्स आणि क्वॉलिटी कण्ट्रोल सटिर्फिकेट त्यांनी मिळवलं. विमानतळावरील सर्व कामं पार पाडण्यासाठी गाडीही शिकल्या. या सर्व कष्टांचं फळ म्हणजे सलग नऊ वर्षं मुंबई आणि तीन वर्षं नाशिक विमानतळावर त्यांनी यशस्वीपणे आपलं काम पार पाडलं.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांमध्ये रिफीलिंग त्यांनी केलं आहे. केवळ एक स्त्री आहे म्हणून त्यांनी कोणत्याही सवलतींची अपेक्षा न करता इतर पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच र्फस्ट, सेकण्ड आणि नाइट शिफ्टही केल्या. यासाठी कधी पहाटे चार वाजता घर सोडावं लागायचं, तर कधी अपरात्री घरी परतावं लागे. तरीही जिद्दीने त्यांनी ही जबाबदारी १४ वर्षांत पार पाडली. कुटुंबियांबरोबरच सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचं त्या सांगतात.

'कोणत्याही क्षेत्रात काम करताना जिद्दीने आणि सचोटीने काम केल्यास यश नक्की मिळतं. एक स्त्री आहे म्हणून काम टाळण्याच्या सबबी न सांगता पुरुषांप्रमाणेच काम करण्यास मी सक्षम आहे, हा आत्मविश्वास ठेवूनच मी प्रत्येक आव्हानाला सामोरी गेले म्हणूनच हे यश मिळवू शकले,' त्या सांगतात.

- मीनाक्षी कुलकर्णी

No comments:

Post a Comment